🪔 शुभ दीपावली 🪔
वसुबारस
भारत हा कृषीप्रधान देश. शेतीसाठी बैल हा अत्यंत उपयुक्त प्राणी. जो आपल्याला धान्य पिकविण्यासाठी मोलाची मदत करतो, काबाड कष्ट करतो त्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी बैल पोळा सण साजरा करतात. बैलाला सजवतात, गोडधोड खाऊ घालतात अगदी ओवाळतात सुध्दा. बैलाला जन्म देणारी, दुधदुभते देणारी, खतासाठी तसेच घर सार विण्यासाठी शेण देणारी औषधी असे गोमुत्र देणारी गोमाता ही देवतेसमान ठरली.
वसुबारस हा तिचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस.वसु म्हणजे धन, रत्न आणि बारस म्हणजे द्वादशी. कार्तिक कृ. द्वादशीला हा सण साजरा करतात. गोधना मुळे शेतीत विपुल धान्य पिकवलेजाते, त्यातूनच संपत्ती निर्माण होते.म्हणून त्या दिवशी सवत्स धेनूची पूजा करतात,गाईच्या गळ्यात हार घालतात, तिला कुंकू लावतात,कामधेनूचे स्मरण करत पक्वान्न खाऊ घालतात.दारात रांगोळी काढतात. घरात लक्ष्मीचे / संपत्तीचे आगमन व्हावे या इच्छेने हा सण साजरा करतात. दिवाळीचा हा पहिला दिवस.
अश्विन कृष्ण त्रयोदशी धन्वंतरी जयंती
ॐ शंखं चक्रं जलौकां दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः ।
सूक्ष्मस्वच्छातिहृद्यांशुक परिविलसन्मौलिमंभोजनेत्रम ||
कालाम्भोदोज्ज्वलांग कटितटविलसच्चारु पीतांबराढ्याम |
वन्दे धन्वंतरिं तं निखिलगदवनप्रौढदावाग्निलीलम ||
आम्हाला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो ही श्री धन्वंतरी चरणी प्रार्थना
धन्वंतरी
याला विष्णूचाच अंशावतार मानतात. समुद्रमंथनातून जी चौदा रत्ने निर्माण झाली त्यांत धन्वंतरीची गणना आहे. तो वैद्यराज असून समुद्रातला अमृतकलश त्यानेच वर आणला. त्याच्याच अलौकिक प्रतिभेने नाना औषधींचे सार अमृताच्या रुपाने देवांना प्राप्त झाले व ते अजरामर झाले. धन्वंतरीला विष्णूच्या अवताराची प्रतिष्ठा लाभल्याने वैष्णव मूर्तींत त्याला स्थान मिळाले. शिल्पयंत्र ग्रंथात त्याच्या मूर्तीची लक्षणे ग्रथीत झाली आहेत ती या प्रमाणे - चतुर्भूज, तेजस्वी, पीतवस्त्रधारी, एक हात अभय मुद्रेत व इतर हातात कमळ, अमृतघट आणि जळू. धनत्रयोदशीच्याच दिवशी या वैद्यराजाचे पूजन करतात व आरोग्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना करतात.
धनतेरस
प्राणिमात्रांच्या जीवनाची मुदत संपल्यावर त्यांचे प्राण हरण करणाऱ्या यमधर्माने एकदा आपल्या दूतांस विचारले की, यमपाश घालून प्राण हरण करताना तुम्हाला कोणाची दया आली होती का ? दूतांनी सांगितले की एकदा हैम नावाच्या राजाच्या मुलाचा विवाह थाटात चालला असता राजपुत्राला सर्पदंशाने मरण आले. त्या वेळी त्याचे प्राण हिरावून
घेताना आम्हाला खूप वाईट वाटले. अशा आनंदाच्या प्रसंगी हा अनर्थ कोसळलेला पाहून आम्हाला खूप वाईट वाटले. असा प्रसंग कोणावर येऊनये असे काही करावे ही आपणाला विनंती. दूतांचे भाषण ऐकून यमधर्म म्हणाले, अश्विन कृष्ण त्रयोदशी पसून पाच दिवस रोज प्रदोषकाली म्हणजे सूर्यस्तानंतर सर्वठिकाणी जो दीपोत्सव करील त्याला तुमच्या इच्छे प्रमाणे मृत्यू येणार नाही. धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला दिवे अर्पण करायची प्रथा आहे. त्या दिवशी जरी फारसे दिवे लावत नसले तरी फक्त त्याच दिवशी दिव्याची ज्योत दक्षिणेकडे ठेवतात.
0 टिप्पण्या