सिंह, लांडगा आणि कोल्हा | marathi bodhakatha

मराठी बोधकथा


 सिंह, लांडगा आणि कोल्हा 


एकदा वनराज सिंह खूप आजारी पडला. त्याची प्रकृती विचारण्यासाठी सगळे पशू रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे. कोल्ह्याचे आणि लांडग्याचे शत्रुत्व होते. या गोष्टीचा फायदा घेऊन लांडग्याने सिंहास सांगितले की, 'महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात नसतो. त्यावरून तो आपल्या विरुद्ध काही कपट-कारस्थान करत असावा असं मला वाटतं. हे ऐकून सिंहाने ताबडतोब कोल्ह्याला बोलावणे पाठवले व त्याला विचारले, 'काय रे, मी इतका आजारी असूनही तू मला भेटायला आला नाहीस, याचा अर्थ काय ?'

तेव्हा कोल्ह्याने उत्तर दिले. 'महाराज, मी आपल्याच करता एखादा चांगलासा वैद्य पहात होतो. कालच मला एका मोठ्या वैद्याने सांगितलं की नुकतंच काढलेलं लांडग्याचं कातडं पांघरलं असता, हा रोग बरा होईल.'

सिंहाला ते खरे वाटले व त्याने कातड्यासाठी ताबडतोब लांडग्याला ठार मारले.


तात्पर्य - दुसर्‍याच्या विनाशाची इच्छा करणारे लोक बहुधा स्वतःच नाश पावतात. 


हे पण वाचा 👇👇👇👇👇 

कोल्हा, रानमांजर आणि ससा | मराठी बोधकथा | bodhkatha marathi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या